मुंबई | २० जुलै २०२६ – CJP Protest
CJP Protest – दिल्लीतील संसद भवनाकडे निघालेल्या कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या मोर्चानंतर देशभरात आंदोलनाचे पडसाद उमटू लागले असून महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी निदर्शने केली. मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलकांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला, तर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली.
CJP Protest = दिल्लीतील मोर्चामुळे देशभरात आंदोलनाची लाट
दिल्लीतील जंतर-मंतर येथून संसद भवनाकडे निघालेल्या CJP च्या मोर्चाला सुरक्षा यंत्रणांनी अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर आणि लाठीचार्ज करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. या घटनांनंतर देशातील विविध राज्यांमध्ये विद्यार्थी संघटना आणि सामाजिक गटांनी आंदोलनाची हाक दिली.

चैत्यभूमी परिसरात तणावपूर्ण वातावरण
मुंबईतील चैत्यभूमी परिसरात संध्याकाळी आंदोलनासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले होते. मात्र, परिसरात आधीपासूनच मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जमावबंदी आदेश लागू असल्याने पोलिसांनी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न केला आणि अनेकांना ताब्यात घेतले. काही ठिकाणी घोषणाबाजी आणि पोलिसांशी शाब्दिक वाद झाल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
एका महिला आंदोलकाने, “आम्हाला पोलिसांपासून नाही, तर शिक्षणमंत्र्यांपासून संरक्षण हवे आहे,” अशी प्रतिक्रिया देत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलकांची भूमिका
आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपण सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ शांततापूर्ण निषेध करण्यासाठी जमल्याचे सांगितले. मात्र, मुंबईत लागू असलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारत कारवाई केली.
शिवाजी पार्क परिसरातूनही विद्यार्थ्यांना ताब्यात
चैत्यभूमीजवळील शिवाजी पार्क परिसरातही अनेक विद्यार्थी जमा झाले होते. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले. “आम्ही कोणतीही घोषणाबाजी केली नव्हती, तरी आम्हाला का ताब्यात घेतले?” असा सवाल काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
पुण्यात FTII विद्यार्थ्यांचे आंदोलन
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधील विद्यार्थ्यांनीही आंदोलन करत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा अन्याय थांबवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
नागपुरात संविधान चौकात निदर्शने
नागपूरमध्ये संविधान चौकात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे तसेच विविध मागण्यांचे फलक होते.
विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षांत भरती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या घटनांचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला नागपूरमधून जाहीर पाठिंबा देण्यात आला.
ठाकरे गटानेही आंदोलनाची भूमिका घेतली
यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही चैत्यभूमी परिसरात आंदोलनाची हाक दिली होती. त्यावेळीही पोलिसांनी कारवाई करून आंदोलन आयोजकांवर गुन्हा दाखल केला होता. सोमवारी होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांना पूर्वसूचना देत पोलिसांनी काहींना आधीच ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.




