भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा तीव्र संघर्ष
परभणी जिल्हातील सहजापूर (जवळा) येथे आज (20 फेब्रुवारी) शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाला कडाडून विरोध दर्शवला. “आमच्या जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला” अशा संतप्त घोषणा देत ग्रामस्थांनी आंदोलन छेडले.
गावाची लोकसंख्या अवघी 350 असताना सध्या 600 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. पोलिसांकडून अटक, नोटिसा आणि आंदोलकांना ताब्यात घेण्याच्या कारवाया सुरू असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
“दडपशाहीची परिसीमा गाठली” – सतेज पाटील
सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, “गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी सरकारने दडपशाहीची परिसीमा गाठली आहे,” असे म्हटले.
शांततापूर्ण आंदोलन चिरडण्यासाठी एवढा मोठा पोलिस फौजफाटा का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांवर बळाचा वापर होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारचा जाहीर निषेध नोंदवला.
राजू शेट्टींचाही फडणवीसांवर प्रहार
राजू शेट्टी यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पोलिसांकडून महिलांशी गैरवर्तन झाल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या पत्नीचे मंगळसूत्र तोडून रानातून हाकलण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी व्यक्त केला.
प्रकल्पाचा उद्देश आणि बदललेला आराखडा
राज्य सरकारचा दावा आहे की, हा महामार्ग राज्यातील प्रमुख शक्तीपीठांना जोडण्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अशा महामार्गाची मागणी कोणीही केलेली नाही.
निवडणुकीपूर्वी सरकारने आराखड्यात बदल करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार कोल्हापूर जिल्हातील कागल व हातकणंगले तालुक्यातील काही भाग वगळण्यात आले. तसेच नांदेड जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि धाराशिव जिल्हा येथेही काही बदल करण्यात आले आहेत. तरीही परभणीसह अनेक ठिकाणी विरोध कायम आहे.
शक्तीपीठ महामार्गाचा संपूर्ण आराखडा
महाराष्ट्रातील इतर महामार्ग प्रकल्प




