हिंगोली : देशातील आठवे ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या औंढा नागनाथ मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त रविवारी (दि.१५) देशभरातून भाविकांची मोठी गर्दी झाली. सकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे ४० हजार भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली. वाढती गर्दी लक्षात घेऊन अभिषेक पूजा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते महापूजा पार पडली. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी, हरिहर भोपी, कृष्णा ऋषी, पद्माक्ष पाठक, नगरसेवक गुड्डू बांगर, निळकंठ देव, वैजनाथ पवार, सुरेंद्र डफळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटे दोन वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. पश्चिम दरवाजातून भाविकांना प्रवेश देण्यात आला. महाराष्ट्रासह गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक येथून भाविक दर्शनासाठी दाखल झाले आहेत.
‘हर हर महादेव, बम बम बोले’च्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला. सकाळी नऊ वाजल्यानंतर गर्दीत आणखी वाढ झाली. भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे २५ क्विंटल साबुदाणा खिचडीचे वाटप केले जात आहे. दानशूर व्यक्तींकडूनही प्रसादाचे वितरण सुरू आहे.
आज सायंकाळी सात वाजता नागनाथाची पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर लेझर ड्रोन शोचे आयोजन करण्यात आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या वाढल्याचे संस्थानचे कर्मचारी वैजनाथ पवार यांनी सांगितले.





