परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेना (ठाकरे गट)चे इक्बाल सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापौरपद स्वीकारल्यानंतर सय्यद यांनी शहरवासियांना विकासाचे आश्वासन देत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आम्हाला भाजपच्या हिंदू-मुस्लिम राजकारणात अडकायचे नाही. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन काम करायचे आहे.”
शहरातील मूलभूत समस्या सोडविणे हेच प्राधान्य राहील, असे त्यांनी नमूद केले. परभणी शहरात वाढत्या धुळीच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहराला ‘धुळीचे शहर’ अशी ओळख मिळाल्याची टीका देखील होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात शहर धूळमुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सय्यद यांनी जाहीर केले.
रस्त्यांची स्वच्छता, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था आणि नागरी सुविधा सुधारण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून ठोस पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवून परभणीकरांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू, असा शब्द नव्या महापौरांनी दिला.





