• Home  
  • बनेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी
- आध्यात्मिक - ताज्या बातम्या - पर्यटन स्थळे

बनेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त नसरापूरच्या बनेश्वर मंदिरात मध्यरात्री गाभारा खुला करण्यात आला असून दुपारपर्यंत सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शन घेतले.

महाशिवरात्रीनिमित्त नसरापूरच्या बनेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

नसरापूर (ता. भोर) येथील बनेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त भक्तांचा जनसागर उसळला आहे. मध्यरात्री शिवशंभोच्या घोषात मंदिराचा गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. पहाटेपासून हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले असून यंदा विक्रमी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देवस्थान ट्रस्टच्या नियोजनामुळे दर्शनबारी सुरळीत सुरू आहे.

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त मध्यरात्री सव्वाबारा वाजता महसूल अधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय अभिषेक पार पडला. त्यानंतर भाविकांसाठी दर्शन व अभिषेकासाठी गाभारा खुला करण्यात आला. पहाटे सहा वाजता गाभारा बंद करण्यात आला असून त्यानंतर बाहेरील गाभाऱ्यातून शिस्तबद्ध दर्शन व्यवस्था सुरू आहे. मंदिराच्या मुख्य दरवाज्याबाहेरपर्यंत दर्शनबारीची रांग पोहोचली असून दुपारपर्यंत सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ट्रस्टच्या वतीने दर्शनबारीसाठी मंडप उभारण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय तसेच प्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन रांगेतील भाविकांसाठी स्क्रीनवर गाभाऱ्यातील थेट दृश्य प्रसारित करण्यात येत आहे.

दरम्यान, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद सदस्य विक्रम खुटवड, पोपटराव सुके, पंचायत समिती सदस्या तृप्ती खुटवड, पंचायत समिती सदस्य विशाल कोंडे, अशोक वाडकर, उद्योजक निखिल डिंबळे, धनेश डिंबळे, माजी उपसरपंच संदीप कदम, नामदेव चव्हाण, इरफान मुलानी, ज्ञानेश्वर झोरे आदींनी दर्शन घेतले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पुरुषोत्तम दातार, उपाध्यक्ष हनुमंत कदम, सचिव अनिल गयावळ, प्रकाश जंगम, आबासाहेब यादव, काशिनाथ पालकर, सतीश वाल्हेकर, ज्योती चव्हाण, व्यवस्थापक प्रसन्न गयावळ आदी उपस्थित होते.

मंदिराच्या मुख्य दरवाज्यापासून नसरापूर गावापर्यंत सुमारे एक किलोमीटर अंतरावर यात्रेची खेळणी, खाद्यपदार्थ, पुस्तके, आईस्क्रीम आदींची दुकाने सजली आहेत. परिसरात राजगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्ड तैनात असून वनविभागाचे कर्मचारीही बंदोबस्तासाठी उपस्थित आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

About Us

parbhaniwarta.in ही महाराष्ट्रातील एक डिजिटल न्यूज वेबसाईट आहे.
परभणी व मराठवाडा परिसरातील ताज्या, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या
वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

Email Us: parbhaniwarta@gmail.com

Contact: +91  91755  94748

PARBHANIWARTA.IN  @2026. All Rights Reserved.   /    Developed by advendesign