नवी दिल्ली: टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि नामिबिया यांच्यात उद्या महत्त्वाचा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियावर दुहेरी संकट ओढवल्याचं चित्र आहे. सलामीवीर अभिषेक शर्मा आजारी असताना आता ईशान किशन दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे.
सराव सत्रादरम्यान जसप्रीत बुमराहने टाकलेला यॉर्कर ईशान किशनच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर आदळला. यानंतर त्याला वेदना होत असल्याचे दिसून आले. तत्काळ फिजिओकडून त्याच्यावर उपचार करण्यात आले.
दुखापत झाल्यानंतर ईशान किशनने पुन्हा सराव सुरू केला. मात्र काही मिनिटांतच त्याने सराव थांबवला. बीसीसीआयकडून याबाबत अधिकृत निवेदन आलेले नाही. तरीही काही मीडिया रिपोर्टनुसार त्याची दुखापत गंभीर नसल्याचं सांगितलं जात आहे.
अभिषेक शर्मा अजूनही साशंक
दरम्यान, टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आजारी आहे. पत्रकार परिषदेत तिलक वर्माने सांगितले की, अभिषेकला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र तो नामिबिया विरुद्धच्या सामन्यात खेळेल की नाही याबाबत अंतिम निर्णय सामना सुरू होण्यापूर्वी घेतला जाईल.
गट स्थिती काय?
भारत सध्या गट अ मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने दोन सामने जिंकत 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. नामिबियावर विजय मिळवल्यास भारत पुन्हा पहिल्या स्थानावर जाऊ शकतो.
टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया संघ
ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर.





